LCB ची मोठी कारवाई.. ‘त्या’ कत्तलखान्यावर धाड..९ गोवंशीय जनावरांची सुटका..क्रूरतेचा पर्दाफाश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संगमनेर शहरात कत्तल करण्यासाठी निर्दयतेने डांबून ठेवलेल्या ९ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अहिल्यानगरने सुटका करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी तसेच अशा ठिकाणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार राहुल द्वारके,राहुल ढोके तसेच चालक चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.पथकाने संगमनेर शहरात गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.दि.06/04/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,संगमनेर येथील मदीनानगर भागात,गौसेरजा मस्जीदच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आली आहेत.
या माहितीवरून पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.तेथे काही गोवंशीय जनावरे चारा-पाण्याविना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून ठेवलेली आढळून आली.पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या इसमास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव मोहम्मद अली अब्दुल अली कुरेशी (वय ३३, रा. भारतनगर, संगमनेर) असे सांगितले.या कारवाईत आरोपी कडून ३,२०,००० रुपये किमतीची ९ गोवंशीय जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५ (अ)(१), ९ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३ व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करत असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध कत्तल व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
