अहिल्यानगर हादरवणाऱ्या ‘त्या’ टोळीला अखेर बेड्या..! ११ लाखांचे सोने..दोन बाईक अन् तीन अट्टल गुन्हेगार गजाआड.. एलसीबी टीमची धडाकेबाज कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एकीकडे भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडले जात असताना पोलीस शांत का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आपल्या स्टाईलने उत्तर दिले आहे.शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वाकोडी शिवारात जुन्या जकात नाक्याजवळ झालेली ही अटक एखाद्या थरारपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हती.२१ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सौ.ताराबाई कोकाटे या आपल्या शेतात कष्ट करत होत्या.शांतता पसरलेली असतानाच अचानक दोन दुचाकी जवळ आल्या आणि क्षणात ताराबाईंच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाले.
या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या खास ‘नेटवर्क’च्या आधारे माहिती काढली की, रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार गणेश दिवानजी काळे हा आपल्या साथीदारांसह अहिल्यानगर-सोलापूर रोडवर येणार आहे.मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,पथकाने जुन्या जकात नाक्याजवळ सापळा रचला.दोन दुचाकींवर तीन संशयास्पद तरुण दिसले. पोलिसांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करताच,आरोपींनी पळ काढला! मात्र, मागावर असलेल्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तिघांनाही झडप घालून ताब्यात घेतले.गणेश दिवानजी काळे (वय २८, रा. वाकोडी) – टोळीचा म्होरक्या,विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळुंज),रोहित लल्या भोसले (वय २३, रा. बीड)
या टोळीची कसून चौकशी केली असता त्यांनी एकामागून एक तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली.यामध्ये अहिल्यानगर तालुका,श्रीगोंदा,सुपा,बेलवंडी आणि तोफखाना पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले:सोन्याचे दागिने: १०२ ग्रॅम (किंमत ९,०४,८०० रुपये)
मोबाईल: ३ नग (किंमत ४५,००० रुपये)
दुचाकी: २ नग (किंमत १,७०,००० रुपये)
एकूण मुद्देमाल: ११,१९,८०० रुपये.मुख्य आरोपी गणेश काळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात चोरी, घरफोडी आणि मारामारीचे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.तर रोहित भोसले याच्यावरही पाथर्डीत ३ गुन्हे दाखल आहेत.पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिष भोये,महादेव गुट्टे आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी फत्ते केली.सध्या या आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली असून, जिल्हयातील अजून किती गुन्हे उघडकीस येतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
