बड्या ब्रँड्सच्या नावाखाली ‘स्लो पॉयझन’..! नगर मध्ये डव्ह,हेड अँड शोल्डर्स आणि पॅन्टीन बनावट शॅम्पू बनवणारी आंतरराज्य टोळी जेरबंद धक्कादायक वास्तव उघड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तुम्ही बाजारातून विकत घेतलेला नामांकित कंपनीचा शॅम्पू खरोखरच सुरक्षित आहे का? की त्या बाटलीत केवळ फेस निर्माण करणारे घातक रसायन भरलेले आहे? अहिल्यानगरच्या एम.आय.डी.सी.पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे,जी लोकांच्या आरोग्याशी खेळून लाखो रुपये कमवत होती. प्रसिद्ध ब्रँड्सच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये घातक केमिकल भरून त्यांची विक्री करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.९ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नागापूर येथील आठवडे बाजारात एम.आय.डी.सी. पोलीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सह्याद्री चौकात एक व्यक्ती नामांकित कंपन्यांचे शॅम्पू अत्यंत स्वस्त दरात विकताना आढळली.संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता एका मोठ्या रॅकेटचे धागेदोरे हाती लागले.पकडलेला आरोपी शानमोहम्मद पप्पूखान आलबी (२५ वर्ष, रा.उत्तर प्रदेश) याने धक्कादायक कबुली दिली.
त्याने त्याचे साथीदार रब्बानी रज्जाक अब्बास आणि फैजान अहमदअली खान यांच्या मदतीने हा काळाबाजार सुरू केला होता. ही टोळी:हिंदुस्तान युनिलिव्हरच्या क्लीनिक प्लस, डव्ह,हेड अँड शोल्डर्स आणि पॅन्टीन यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायची.त्यात अज्ञात स्वस्त केमिकल आणि पावडरचे मिश्रण भरले जायचे.बनावट ट्रेडमार्क आणि लेबलचा वापर करून हे शॅम्पू अस्सल असल्याचे भासवून सामान्य ग्राहकांना विकले जायचे.पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १,००,१८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये शॅम्पूने भरलेल्या शेकडो बाटल्या, पॅकिंगचे साहित्य आणि शॅम्पू बनवण्यासाठी लागणारे घातक केमिकल पावडर यांचा समावेश आहे.मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक असलेला हा बनावट माल जप्त करून पोलिसांनी पुढील मोठा अनर्थ टाळला आहे.
या प्रकरणी हिंदुस्तान युनिलिव्हरचे फील्ड ऑफिसर श्री.किरीत गुणवंतराय पंड्या यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन येथे BNS कलम ३१८(४), कॉपीराईट ॲक्ट १९५७ (कलम ६३, ६५) आणि ट्रेडमार्क ॲक्ट १९९९ (कलम १०३, १०४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी.चौधरी,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ राजू सुद्रिक,शैलेश रोहोकले,सचिन आडबल,किशोर जाधव,दीपक फुंदे,नवनाथ दहिफळे व दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.
