धक्कादायक..! चालत्या चारचाकी गाडीवर थेट गोळीबार नेम चुकला..भररस्त्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला संपवण्याचा थरारक प्रयत्न..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केला आहे.भररस्त्यात चालत्या गाडीवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, शहरात सध्या तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली.शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दबा धरून त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला.चालत्या गाडीवर अचानक गोळ्या झाडल्या गेल्याने परिसरात एकच घबराट पसरली.हल्लेखोरांनी प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता.मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली.प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू, हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात!
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून कसून तपास सुरू केला आहे.हा हल्ला नेमका का करण्यात आला? या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य आहे की इतर काही वैयक्तिक कारण? याचा शोध पोलीस घेत आहेत.सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून,गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
