अख्ख्या महाराष्ट्रात कधीच घडलं नाही ‘असं’ अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी चौंडीत १४ जून रोजी घडणार..जावईबापूंचा होणार ‘शाही पाहुणचार’.. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून..वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सध्या अधिक मास (धोंडा महिना) सुरू आहे आणि मराठी संस्कृतीत या महिन्यात लेक-जावयाला घरी बोलावून त्यांना पुरणाचे धोंडे खाऊ घालण्याची आणि चांदीचे वाण देण्याची शतकानुशतके जुनी परंपरा आहे.पण,जर एखाद्या घरातील नाही,तर अख्ख्या गावातील शेकडो लेक-जावई एकाच वेळी,एकाच छताखाली धोंडे जेवणाचा आस्वाद घेणार असतील तर? होय, हे अजिबात खोटे नाही! असा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलावहिला,अत्यंत अनोखा आणि भव्य ‘धोंडे जेवण’ सोहळा पार पडणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पावन जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता.जामखेड) येथे रविवार,१४ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून हा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे.या आधी चौंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची कॅबिनेट बैठक झालेली आहे कदाचित हा ही महाराष्ट्रातील खेडेगावात पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल.विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा आगळावेगळा उत्सव साकारत असून,संपूर्ण राज्यात सध्या याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.चौंडी गावातील लाडक्या लेक आणि जावयांसाठी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत जंगी नियोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चालणाऱ्या या सोहळ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
सकाळी ९:०० वा. – जावयांना फेटा आणि शाही स्वागत: चौंडी नगरीत लेक-जावयांचे आगमन होताच त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाईल.सर्व जावईबापूंना मानाचा फेटा बांधला जाईल आणि त्यानंतर त्यांची वाजतगाजत भव्य स्वागत मिरवणूक काढली जाईल.
सकाळी १०:०० वा. – अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व महा-फोटोशूट: मिरवणुकीनंतर सर्व लेक-जावई ‘अहिलेश्वर मंदिर’ येथे दर्शन घेतील.यानंतर या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून सर्व सासरच्या आणि माहेरच्या मंडळींचे एक ‘स्मरणीय समूह छायाचित्रण’ (Group Photo) केले जाईल.
सकाळी १०:३० वा. – मुख्य सोहळा व सत्कार: ‘माणकोजीराव शिंदे सभागृहात’ मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. येथे प्रतिमा पूजन, सत्कार समारंभ आणि उपस्थितांचे मार्गदर्शन व मनोगत व्यक्त होईल.
दुपारी १२:३० वा. – ‘धोंडे जेवण’ आणि मानाची भेट: ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत,ते चमचमीत पुरणाचे धोंडे जेवण दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. जेवण झाल्यानंतर सर्व लेक-जावयांना खास सुप्रसिद्ध भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल.हा केवळ कार्यक्रम नाही, तर संस्कृतीचा उत्सव: प्रा. राम शिंदे
”चौंडी नगरीतील लाडक्या लेक-जावयांचा धोंडे जेवण व सन्मान सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही. हा गावातील विविध कुटुंबांतील लेकी आणि जावई यांच्याप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान व्यक्त करणारा आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे व अधिक मासाचे औचित्य साधून हा सोहळा होत आहे. आपल्या संस्कारांचा आणि नात्यांचा हा सुंदर सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.”
– प्रा. राम शिंदे (सभापती, विधानपरिषद)
अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात ‘पहिलाच’ प्रयोग!
एखाद्या कुटुंबात जावयाचे चोचले पुरवले जाणे सामान्य आहे, पण संपूर्ण गाव एकत्र येऊन आपल्या गावातील सर्व लेकींना आणि जावयांना ‘गावजेवण’ घालण्याची ही राज्यातील पहिलीच घटना ठरत आहे. या अनोख्या उपक्रमामुळे चौंडी ग्रामस्थांमध्ये कमालीचा उत्साह असून, ‘आमचा जावई, संपूर्ण गावाचा जावई’ अशीच भावना सध्या संपूर्ण जामखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. चौंडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व लेक-जावयांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
