उपवर्गीकरणा विरोधात बीड ते मुंबई लाँग मार्च: २५ जूनला छत्रपती संभाजीनगरहून ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’चा वाहनांचा मोठा ताफा आझाद मैदानाकडे रवाना होणार!
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी),दि. १२ जून:-अनुसूचित जाती व जमातीच्या उपवर्गीकरणाच्या (Sub-categorization) विरोधात सध्या राज्यभरात तीव्र असंतोष पसरला असून, १० जून रोजी बीड येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ला आता प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. या आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी आणि लाँग मार्चला सक्रिय पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ पक्षाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक येथील सुभेदारी विश्रामगृह येथे संपन्न झाली. पक्षाचे राष्ट्रीय पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत २५ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून चारचाकी वाहनांचा एक मोठा आणि भव्य ताफा मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
२६ जूनला आझाद मैदानावर होणार महा-धडक
बीड येथून पायी निघालेला हा लाँग मार्च २६ जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे. या मोर्चाचा समारोप आणि सरकारला इशारा देण्यासाठी मुंबईत भव्य शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. याच आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून २५ जून रोजी छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे कूच करतील, जेणेकरून २६ जूनच्या मुख्य आंदोलनात पक्षाचा मोठा सहभाग असेल.सुभेदारी विश्रामगृहातील या बैठकीत केवळ लाँग मार्चच्या नियोजनावरच नव्हे, तर आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावरही सविस्तर मंथन झाले. गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता या धर्तीवर पक्ष वाढीसाठी गतीने काम करण्याचा संकल्प पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वंचित आणि बहुजन घटकांच्या हक्कांसाठी पक्ष आगामी काळात आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असा सूर या बैठकीत उमटला.या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे अनेक बडे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राज्य उपाध्यक्ष अँड. अविनाश थिट्टे, राज्य सहसचिव वैभव लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे, जिल्हा सचिव रवि मोरे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संतोष उणवणे, रुग्ण न्याय हक्क आघाडीचे शहराध्यक्ष जवाहर भगुरे, कल्पना ताई जमधडे, मध्य शहराध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे, विकास साबळे, प्रकाश घोरपडे, अमित मोरे आणि रमजानी भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी केले, तर बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी मानले. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून २५ जूनच्या वाहनांच्या ताफ्याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
