तोफखाना पोलिसांचा भल्या पहाटे ‘सर्जिकल स्ट्राईक’! १९ आरोपींना ठोकल्या बेड्या..न्यायालयाला चकवा देणाऱ्यांची आता खैर नाही
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-न्यायालयाचे आदेश डावलून प्रदीर्घ काळापासून पोलिसांना आणि न्यायालयाला चकवा देणाऱ्या फरार तसेच वॉरंटमधील आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्याने थेट मोहीम उघडली आहे.आज,दि.२७ जुलै २०२६ रोजी भल्या पहाटे ६:०० वाजता तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून एकाच वेळी तब्बल १९ आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ मुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.न्यायालयातून प्राप्त झालेल्या अजामीनपात्र वॉरंट (NBW – Non-Bailable Warrant) मधील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हे विशेष कोंबिंग ऑपरेशन आखले होते.
भल्या पहाटे संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकून पोलिसांनी न्यायालयाला हुलकावणी देणाऱ्या १० अजामीनपात्र आरोपींना थेट ताब्यात घेऊन अटक केली.त्याचप्रमाणे,जामीनपात्र वॉरंट (B.W.) मधील ९ आरोपींचा जामीन बंधपत्र भरून घेत, त्यांना न्यायालयात वेळेवर हजर राहण्याची कडक समज देण्यात आली आहे.अशा प्रकारे एकूण १९ आरोपीं विरुद्ध एकाच दिवशी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या प्रत्यक्ष सूचना व मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वात तोफखाना पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी पहाटेच्या वेळी नियोजनबद्ध रीतीने ही कामगिरी फत्ते केली.
गुन्हेगारांना पोलीस निरीक्षकांचा कडक इशारा
”तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी यापुढेही वेळोवेळी अचानक वॉरंट बजावणी आणि कोंबिंग ऑपरेशन्स राबवले जातील. न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या किंवा फरार राहणाऱ्या आरोपींवर याहून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.बालाजी वैद्य (पोलीस निरीक्षक,तोफखाना पोलीस ठाणे,अहिल्यानगर)
