पैशांचा वाद,तलवारीचा वार आणि कारखाली चिरडून खून!त्या भीषण हत्याकांडाचा गुन्हे शाखेकडून अवघ्या २४ तासांत पर्दाफाश..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दिवाळी सणानिमित्त उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानावरील पैशांच्या क्षुल्लक वादातून श्रीरामपूर शहरात एका वृद्धाचा कारखाली चिरडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत धडक कारवाई करत अवघ्या २४ तासांच्या आत २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.दिनांक ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण (वय २३,रा.पंचशील कॉलनी,टिळकनगर, श्रीरामपूर) यांनी कामगार चौक येथे उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानावर आरोपी आले होते.फटाके घेऊन पैसे न देण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घातला.
वाद विकोपाला गेल्याने आरोपी अमित रविकांत पटारे याने फिर्यादीवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला,मात्र फिर्यादीने तो वार चुकवला. यानंतर आरोपींनी तिथेच न थांबता फिर्यादीचे घर गाठले. तेथे फिर्यादीचे चुलते मयत शफी नवाब पठाण यांच्या अंगावर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार दोन वेळेस घालून त्यांना जीवे ठार मारले.या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१), ११८(१), १८९(२), १९० सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले.पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि.संदीप दरवडे,पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,फुरकान शेख, अशोक लिपणे,रमीजराजा आत्तार,भगवान थोरात,सुनील मालणकर,प्रशांत राठोड, अरुण मोरे तसेच शेवगाव उपविभागाचे ज्ञानेश्वर शिंदे व दत्तात्रय गव्हाणे यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वांजुळी (ता. नेवासा) परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून उमर समीर शेख (वय २२ वर्षे,रा.सम्राटनगर, सुतगिरणी फाटा,श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर),अमित रविकांत पठारे (वय २१ वर्षे, रा.दत्तनगर,सुतगिरणी रोड, श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले.गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी सागर राहुल गुंजेकर,आनंद अमर पवार आणि त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
