दिवाळीच्या तोंडावर कत्तलीसाठी नेणाऱ्या ६२ जनावरांना जीवदान..स्थानिक गुन्हे शाखेची ‘येथे’ मोठी कारवाई..
अहिल्यानगर/श्रीगोंदा (प्रतिनिधी):-कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ६२ लहान-मोठ्या गोवंशीय प्राण्यांची स्थानिक गुन्हे शाखेने ऐनवेळी धाड टाकून सुटका केली आहे.श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरातील संदीप पाचपुते यांच्या गोठ्याजवळ आणि नवीन पेट्रोल पंपाच्या कंपाऊंड भिंतीच्या आडोशाला ही बेकायदेशीर प्राण्यांची दाटीवाटी करण्यात आली होती.पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर कत्तलखान्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.दरम्यान,फैजान उर्फ अबुझर अब्दुलहक कुरेशी (रा.खाटीक गल्ली,दौंड,जि.पुणे) याने काष्टी ते दौंड हायवे रोडलगत संदीप पाचपुते यांच्या गोठ्याजवळ तसेच नवीन पेट्रोल पंपाच्या वॉल कंपाऊंडच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.माहिती मिळताच एलसीबी (LCB) आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.तेथे विनापरवाना व अत्यंत निर्दयपणे बांधून ठेवलेली ६२ गोवंशीय जनावरे (गायी,गोऱ्हे व कालवडी) मिळून आली.या प्रकरणी आरोपी फैजान उर्फ अबुझर अब्दुलहक कुरेशी याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १००७/२०२६ अन्वये:महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम (१९९५ सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९ प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३ व ११ अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकूळे, पोउपनि.विकास जाधव,पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे,भिमराज खर्से,अमृत आढाव,भाऊसाहेब काळे, प्रताप देवकाते,जालिंदर साखरे व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सपोनि कौशलरामनिरंजन वाघ,पोउपनि.रसूल शेख, नंदकुमार भैलुमे,पोलीस अंमलदार राहुल मोढळे,अरुण पवार यांनी केली आहे.पोलिसांच्या या कौतुकास्पद कारवाईचे परिसरातून मोठे स्वागत होत आहे.
