विखे पाटील हॉस्पिटलची कमाल! चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया, तीन रुग्णांना मिळाला नवा चेहरा आणि नवा दिलासा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी:-येथील डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाने वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे.चेहऱ्याची हाडे आणि जबडा फ्रॅक्चर झालेल्या तीन रुग्णांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.विशेष म्हणजे, महागड्या उपचारांचा कोणताही ताण न घेता, ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे या तिन्ही रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार झाले आहे.पहिल्या रुग्णाच्या वरचा जबडा,खालचा जबडा आणि गालाचे हाड एकाच वेळी फ्रॅक्चर झाले होते,तर इतर दोघांनाही जबड्याची गंभीर दुखापत झाली होती.फ्रॅक्चर झालेली हाडे योग्य जागी बसवून विशेष प्लेट्स आणि स्क्रूच्या साहाय्याने ती पक्की करण्यात आली,जेणेकरून चेहऱ्याचा नैसर्गिक आकार आणि बोलणे-जेवण्याची क्षमता पूर्ववत होईल.
प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.अजित काळे,डॉ.धीरज जुमडे आणि डॉ.अश्विन वानखेडे यांनी आपल्या अचूक कौशल्याने या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.खिशाला कात्री लावणाऱ्या या महागड्या शस्त्रक्रिया आयुष्मान भारत योजनेमुळे पूर्णपणे मोफत झाल्या,ज्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.स्थानिक पातळीवर अशा उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता गंभीर दुखापतींसाठी रुग्णांना मोठे शहर गाठण्याची गरज उरलेली नाही.
