खाकीचा दणका..! संगमनेरमध्ये १९०० किलो गोमांससह ९ जण जेरबंद, तर श्रीरामपूर-श्रीगोंद्यात अवैध धंद्यांवर एलसीबीची धडक कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर,स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मोठी कामगिरी केली आहे.संगमनेरमध्ये सुरू असलेल्या गोमांस विक्रीच्या अवैध अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून,१९०० किलो गोमांससह इतर असा एकूण ९ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच श्रीरामपूर व श्रीगोंदा परिसरात जुगार व दारू अड्ड्यांवर कारवाई करत १ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गोमांस कत्तलखानावरील कारवाई व मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे,राहुल द्वारके,अमृत आढाव,सतीष भवर,बाळासाहेब गुंजाळ आणि योगेश कर्डीले यांचे पथक तयार करून माहिती काढण्यासाठी रवाना केले होते.३० ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कादरीनगर, गौसो रजा मशीद जवळ, गल्ली नं.२ व ३ येथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली.पथकाने पंचासमक्ष छापा टाकत सद्दाम मोहम्मद जावेद कुरेशी,वय २९,रा.मुगलपूरा,जुना राजवाडा,संगमनेर,गुलाम जर्रानी रब्बानी सौदागर,वय १९,रा.भारतनगर,हावडाब्रीज, संगमनेर,गुलाम मुस्तफा मुश्पीक शेख,वय २०,रा. गल्ली नं.२,जमजम कॉलनी, संगमनेर,आवेज जानू कुरेशी, वय २१, रा.गल्ली नं.५, मदीनानगर,संगमनेर,आसीफ इक्बाल खान,वय ३२,रा. मदीनानगर,संगमनेर,कैस अश्पाक कुरेशी,वय २७,रा. गल्ली नं.२,मदीनानगर, संगमनेर,याकुब रज्जाक कुरेशी,वय ४२,रा.गल्ली नं.५, मदीनानगर,संगमनेर,परवेश जानू कुरेशी,वय २६,रा.गल्ली नं.५,मदीनानगर,संगमनेर,एक विधीसंघर्षीत बालक,वय १७, रा.गल्ली नं.३,मदीनानगर, संगमनेर या ९ आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, अनस सरवर कुरेशी (रा. हावडा ब्रीज, संगमनेर) आणि सोमू उर्फ आतीक रफीक कुरेशी (रा. मोगलपूरा,संगमनेर) तसेच ‘छोटा हत्ती’ वाहन क्रमांक एमएच-१४-सीडी-०८३९ चा मालक हे फरार आहेत.याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२४/२०२६ अन्वये बीएनएस कलम २७१, ३२५, ३(५) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित २०१५ चे कलम ५(अ)(ब)(क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/संतोष मुटकुळे यांनी सपोनि/हरिष भोये आणि पोलीस अंमलदार अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे,किशोर शिरसाठ,रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे,गणेश धोत्रे, गणेश लबडे,श्यामसुंदर जाधव, दिपक जाधव,मनोज साखरे, रोहित मिसाळ,रोहित येमुल व प्रताप देवकाते यांची दोन पथके तयार करून अवैध धंद्यांवर छापे टाकण्याचे आदेश दिले होते.३० ऑक्टोबर २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत ३ गुन्ह्यांत एकूण १,२४,९६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर संपूर्ण धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
