चास घाटात सैन्याच्या ‘Y’ चिन्हाजवळ थांबले अन् LCB ने घातली धाड;मकोकातील कुख्यात दरोडेखोर जेरबंद!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका अत्यंत सराईत आणि खतरनाक दरोडेखोरांच्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.मकोका (MCOCA) सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेले आरोपी पुन्हा एकदा महामार्गावर हातात धारदार शस्त्रे आणि गलोरी घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना धाडसी कारवाई करत रंगेहात पकडले. या कारवाईत ४ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून,६ जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर तालुका परिसरात गस्त घालत होते. याच वेळी नगर-पुणे महामार्गावरील चास गावाच्या शिवारात,चास घाटाच्या वर असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या ‘Y’ आकाराच्या चिन्हाजवळ १० जणांची टोळी हत्यारांसह थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. प्रवाशांना अडवून,मारहाण करून लुटण्याचा त्यांचा हेतू होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खात्री करून तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच दरोडेखोरांनी पळण्याचा प्रयत्न केला,मात्र पथकाने पाठलाग करून सुशांत सुरेश भोसले (रा.पिंपळगाव कवडा),वैभव किरण भोसले (रा.धानोरा,ता.आष्टी,जि. बीड),अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (रा. पिंपळगाव कवडा),राम उर्फ बोकड्या उर्फ बठ्या लखन काळे (रा.कामरगाव) या ४ जणांना जागीच पकडले.पोलीस पथकाने घटनास्थळावरून ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये ३ मोटारसायकल,दोन तीक्ष्ण चाकू,टायटन कंपनीचे घड्याळ आणि गलोरचा समावेश आहे.
पकडण्यात आलेले सर्व आरोपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी चास-कामरगाव शिवारातील घाटात नगर-पुणे हायवेवर यापूर्वीही ५ ते ६ वाहने अडवून प्रवाशांना मारहाण करत लुटल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे,सुपा पोलीस ठाण्यातील मकोका (MCOCA) गुन्ह्यात सुशांत भोसले,अविनाश भोसले आणि राम काळे हे तिघे फरार होते.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सपोनि हरिष भोये तसेच पोलीस अंमलदार शाहीद शेख,अरूण गांगुर्डे,अतुल लोटके,वंदना मोढवे, योगेश भिंगारदिवे,शामसुंदर जाधव,अमोल आजबे,प्रकाश मांडगे,सागर ससाणे,रोहित येमुल,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे,मनोज साखरे व अरूण मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
