गुंठेवारीधारकांना दिलासा द्या, नाहीतर मनपावर धडकणार ‘पँथर’! मुदतवाढीसाठी ‘द रिअल पँथर ऑफ इंडिया’चा एल्गार..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-शहरभरातील गुंठेवारी भागातील हजारो सर्वसामान्य कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार बनलेल्या गुंठेवारी नियमितीकरणाच्या मुद्द्यावर आता ‘द रिअल पँथर ऑफ इंडिया’ ही संघटना आक्रमक झाली आहे.प्रशासनाने दिलेली मुदत अत्यंत अपुरी असून, नागरिकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी व शुल्क भरण्यासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी,अन्यथा महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडू,असा थेट इशारा संघटनेने मनपा प्रशासनाला दिला आहे.छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारीख जाहीर केली असून,वीकेंडलाही कक्ष सुरू ठेवला आहे.प्रशासनाच्या या पायरीचे स्वागत होत असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील चित्र अत्यंत बिकट आहे. जुने ७/१२ उतारे,फेरफार नोंदी आणि महसुली नकाशे मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड धावपळ करावी लागत आहे.अंतिम मुदत जवळ आल्याने महापालिकेचे व सेवा केंद्रांचे सर्व्हर सातत्याने डाऊन होत असून,नागरिकांचा खोळंबा होत आहे.कष्टकरी व मध्यमवर्गीय नागरिकांना नियमितीकरणाचे शुल्क एकत्र करण्यासाठी वेळ लागत आहे.
३१ ऑक्टोबरची मुदत कायम राहिल्यास शहरातील हजारो कुटुंबे या योजनेपासून वंचित राहून त्यांच्या घरांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जनभावनेचा आणि वस्तुस्थितीचा आदर करून महापालिका आयुक्तांनी त्वरित १ महिन्यांची मुदतवाढ जाहीर करावी,अशी आग्रही मागणी ‘द रिअल पँथर ऑफ इंडिया’च्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.मुदतवाढ न मिळाल्यास रस्त्यावर उतरून नागरिकांच्या हक्कासाठी लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिनेश गवळे,प्रदेश महासचिव अरशाद लखपती,मराठवाडा अध्यक्ष सुनील खरात,राज्य संघटक जयनाथ बोर्डे, मराठवाडा अध्यक्ष (कामगार विंग) संतोष उणवणे, जिल्हाध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हाध्यक्ष (कामगार विंग) रवि मोरे,जिल्हा सरचिटणीस अमित मोरे,शहर उपाध्यक्ष अनिस गंगापुरकर,शाहीर अशोक शिरसाठ आणि सुनील वाहूळ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
