शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत:उद्या ‘या’ भागात मिळणार पाणी..आता पाणी काटकसरीने वापरा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहराला पाणीपुरवठा करणारी ११०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नांदगाव शिवारातील रभाई ओढ्यामध्ये फुटल्याने शहर तसेच उपनगरांतील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.महावितरणमार्फत (MSEDCL) सुरू असलेल्या सोलर बसविण्याच्या कामादरम्यान ड्रीलद्वारे खोदकाम करताना ही जलवाहिनी फुटली.यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने मुळानगर येथून होणारा पाणी उपसा तातडीने बंद करण्यात आला आहे.घटनास्थळावरील भौगोलिक परिस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे.पाणी उपसा बंद असल्याने वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने आणि निर्धारित वेळेत भरणे शक्य झालेले नाही.
प्रभावित भाग आणि पाणीपुरवठ्याचे नवे नियोजन:
उपनगरांना उद्या पाणी: पाईपलाईन रोड,निर्मलनगर, सूर्यनगर,लक्ष्मीनगर,कल्याण रोड,शिवाजीनगर,केडगावचा काही भाग,मुकुंदनगर, सहकारनगर आणि बालिकाश्रम रोड या भागांत आज पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.या उर्वरित भागात शनिवारी (२४ ऑक्टोबर) पाणीपुरवठा केला जाईल.
मध्यवर्ती भागात कमी दाबाने पुरवठा:शहराच्या मध्यवर्ती भागात शनिवारी रोटेशननुसार होणारा पाणीपुरवठा उशिराने आणि कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी परिस्थितीची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
