प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचा निर्घृण खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला..एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना बेड्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह धरणाच्या बॅक वॉटर कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता.मात्र, एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने चक्रे फिरवून अवघ्या काही वेळातच या थरारक खुनाचा उलगडा केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,मयत गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय ३२, रा.कमलपूर,ता.श्रीरामपूर) याचे आरोपी महेश राजेंद्र जाधव याच्या पत्नीसोबत लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता गणेश हा तिला भेटण्यासाठी शिंगवे नाईक (ता.जि. अहिल्यानगर) येथील तिच्या घरी गेला होता.तो घरी आल्याचे समजताच आरोपींनी त्याला रंगेहात पकडले. रागाच्या भरात त्याला जबर मारहाण करून जीवे ठार मारण्यात आले.कोणालाही संशय येऊ नये व खुनाचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून आरोपींनी त्याचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा डॅमच्या बॅक वॉटर कॅनॉलमध्ये फेकून दिला.मयत गणेशचे भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९१६/२०२६ नुसार बीएनएस कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.गुन्ह्याची गंभीरता ओळखून पोलिसांनी तत्काळ विशेष पथक तयार केले आणि कॅनॉल परिसरात कसून शोधमोहीम राबवली.राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा शिवारातील कॅनॉलमधून अखेर गणेश गायकवाड याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला महेश राजेंद्र जाधव हा आरोपी जळगाव (ता. राहाता) येथे लपून बसल्याची गुप्त बातमी मिळताच सपोनि हेमंत थोरात यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.योगेश राजेंद्र जाधव हा दुसरा आरोपी मुळा डॅम,राहुरी येथे लपलेला असताना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.हरीश भोये यांच्या पथकाने त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.न्यायालयाने दोन्ही आरोपींना २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात,स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.हरीश भोये,पोसई. अजय कोटे,सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ शैलेश रोहोकले,पोहेकॉ.राजू सुद्रिक,पोहेकॉ.फोलाणे,पोहेकॉ.सुशांत दिवटे,पोकॉ.दिपक फुंदे, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. किशोर जाधव,पोकॉ.सुरज देशमुख,पोकॉ.अक्षय रोहोकले,मपोकॉ.थोरात तसेच एलसीबीचे पोहेकॉ.अरुण गांगुर्डे,पोहेकॉ.राहुल हारके, पोकॉ.सतीश भवर,पोकॉ. सागर ससाणे,पोकॉ.अरुण सांगळे व दक्षिण मोबाईल सेलच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
