LCB..वारे पठ्ठ्या..! शेवग्याच्या झाडात लपवून पिकवला अडीच लाखांचा गांजा; ८१ वर्षांच्या आजोबांचा प्रताप..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतात शेवग्याची लागवड करून चार पैसे गाठीशी बांधण्याऐवजी,शेवग्याच्या झाडांमागे चक्क गांजाची शेती फुलवल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यात उघडकीस आला आहे.वाटापूर शिवारात शेवगा पिकाच्या आडून गांजाची छुप्या पद्धतीने लागवड करणाऱ्या एका ८१ वर्षांच्या वृद्धासह दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.या धडक कारवाईत पोलिसांनी २ लाख ५५ हजार रुपये किमतीची ५.१० किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक कारवाईचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.विकास जाधव व अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,विकास साळवे,अशोक लिपणे, रमीझराजा आत्तार,अजिनाथ पाखरे आणि ज्योती शिंदे यांचे पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयितांचा माग काढत होते.तपासादरम्यान पथकाला गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, वाटापूर येथील रखमाजी आयनर याने गावात जमीन वाट्याने करून त्यामध्ये शेवगा पिकाच्या झाडांमध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड केली आहे.पथकाने ही माहिती तत्काळ सोनई पोलिसांना कळविली.उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव उपविभाग) यांच्या आदेशानंतर सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि.अनिल मोरे,स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक आणि सोनईचे पोलीस अंमलदार अंकुश दहिफळे, बाचकर,प्रविण क्षिरसागर, निखील तमनर व बनकर यांनी पंचांसह शेतात छापा टाकला.
शेताची झडती घेतली असता, शेवग्याच्या पिकाच्या आड लपवलेली लहान-मोठी गांजाची हिरवीगार झाडे होती.पोलिसांनी घटनास्थळावरून रखमाजी कुशाबा आयनर (वय ८१, रा. वाटापूर,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर),सोपान गुजाबा रूपनर (वय ४६, रा. अंमळनेर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.छाप्यादरम्यान पोलिसांनी २,५५,०००/- रुपये किमतीची ५.१० किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली.या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ चे कलम ८(ब)(क), २०(अ)(ब), २०(१)(२)(क) सह २२(क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सोनई पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
