बसस्थानकावर आंदोलनाचा धसका! दोषी कंडक्टर गिलकेवर ७ दिवसांत कारवाईचे आगार व्यवस्थापकांचे लेखी आश्वासन;शेकडो कार्यकर्त्यांचा प्रशासनाविरोधात एल्गार..
श्रीगोंदा (प्रतिनिधी):-श्रीगोंदा-त्र्यंबकेश्वर बस प्रवासादरम्यान एका आजारी महिलेची जाहीर मानहानी करणाऱ्या उद्धट वाहक (कंडक्टर) गिलकेवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी,आगारातील भंगार बसेस हटवून घाणीचे साम्राज्य संपवावे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा छळ थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी श्रीगोंदा बस स्थानकाबाहेर जनआक्रोश उसळला.पत्रकार चंदन घोडके यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या धडक आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून,आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांनी ७ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषी वाहकावर कठोर कारवाई करण्याचे अधिकृत लेखी आश्वासन दिले आहे.श्रीगोंदा एसटी आगारातील मनमानी आणि बेजबाबदार कारभाराच्या विरोधात सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते,विविध संघटना आणि पत्रकार आक्रमक झाले होते.आंदोलनादरम्यान एसटी प्रशासनाच्या मनमानी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे (BSP) नेते सुनील ओहोळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकराइट) चे नेते निलेश गायकवाड यांनी आंदोलकांची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत प्रशासनाला खडे बोल सुनावले.आंदोलनाचा वाढता रोख आणि आंदोलकांचा तीव्र संताप लक्षात घेऊन श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रणव भापकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर,संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने ७ दिवसांचा अवधी मागितला.तसेच,दोषी वाहक गिलके याच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
शेकडो सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांची उपस्थिती
या आंदोलनात विविध क्षेत्रांतील मान्यवर,कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यामध्ये सुनील ओहोळ (बसपा), निलेश गायकवाड (RPI आंबेडकराइट),सचिन घोडके, बापु भोईटे,प्रशांत शिंदे, अंबादास घोडके,भीमराव घोडके (वंचित बहुजन आघाडी),अमोल डाळिंबे, सागर आल्हाट,दीपक घोडके, दिलीप कर्डिले,नितीन जावळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सत्यवान शिंदे,योगेश चंदन, श्रीरंग साळवे,जावेद इनामदार, आप्पा चव्हाण व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
