कोट्यवधींच्या सिस्पे घोटाळ्यात मोठी घडामोड! ‘तो’ फरार असलेला बडा मासा अखेर ‘LCB’ च्या जाळ्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात एकच खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘सिस्पे घोटाळा’ (Syspe Scam) प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे.ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून महिनान्-महिने पोलिसांना गुंगारा देणारा फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून,बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी फाट्याजवळ सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.या कारवाईमुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ६७३/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) कायदा (MPID Act) १९९९ च्या कलम ३ अंतर्गत ठेवीदारांच्या मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.या गंभीर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सुरू असून, प्रकरणातील आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाले होते.फरार आरोपींचा माग काढण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेला कळवले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने विशेष पथक तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केले.२२ ऑक्टोबर २०२६ रोजी हे पथक संशयितांचा शोध घेत असताना,या गुन्ह्यातील आरोपी दशरथ विठ्ठल रोडे हा गव्हाणवाडी फाटा परिसरात येणार असल्याची अत्यंत गोपनीय व खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता परिसराची नाकाबंदी केली आणि अत्यंत शिताफीने आरोपी दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१,रा.भारत गॅस गोदामासमोर,वडाळी रोड, ता.श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) याच्या मुसक्या आवळल्या.ताब्यात घेतलेल्या आरोपी दशरथ रोडे याला पुढील सखोल तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) हवाली केले असून,या घोटाळ्यात आणखी कोणाकोणाचे हात गुंतले आहेत आणि फसवणुकीची व्याप्ती कुठपर्यंत आहे,याचा कसून तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.सदर धडक व कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,रोहित मिसाळ,प्रताप देवकाते व फुरकान शेख यांच्या पथकाने केली आहे.
