Ahilyanagar..माणुसकीला काळिमा..आजारी महिलेला बसच्या पायरीवर बसवून कंडक्टर मात्र ऐटीत खुर्चीवर..सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप २२ ऑक्टोबरला बस आगारासमोर बेमुदत उपोषणाचा एल्गार..!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):-श्रीगोंदा बस आगाराचा कारभार पूर्णपणे रामभरोसे चालला असून प्रवाशांची जीवघेणी हेळसांड,स्थानकातील दुर्गंधीचे साम्राज्य आणि अधिकाऱ्यांची मुजोरी याविरोधात नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. श्रीगोंदा–त्र्यंबकेश्वर बसमध्ये एका आजारी महिलेची सर्वांसमक्ष मानहानी करणाऱ्या बेजबाबदार वाहक गिलकेवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी,या प्रमुख मागणीसह आगारातील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवार,२२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा बस आगारासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात जिल्हा विभाग नियंत्रक, अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.९ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा-त्र्यंबकेश्वर बस प्रवासादरम्यान एका आजारी महिला प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली. अस्वस्थतेमुळे तिला उभे राहणे किंवा व्यवस्थित बसणे अशक्य झाल्याने ती अक्षरशःबसच्या पायऱ्यांवर बसली.मात्र, प्रवाशांना सेवा देण्याचे कर्तव्य असलेल्या वाहक गिलके यांनी त्या महिलेला मदत करणे किंवा बसण्यासाठी जागा देणे तर दूरच,स्वतःऐटीत सीटवर बसून त्या आजारी महिलेची सर्वांसमक्ष जाहीर विटंबना केली.या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गातून गिलके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.श्रीगोंदा आगारात जीर्ण,खिळखिळ्या आणि भंगार झालेल्या बसेसची संख्या प्रचंड वाढली आहे.रस्त्यात अचानक बंद पडणे,तांत्रिक बिघाड होणे यामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत असून या गाड्या तातडीने भंगारात काढून नव्या बसेस देण्याची मागणी होत आहे.बस स्थानक परिसर आणि प्लॅटफॉर्मवर कचरा व अस्वच्छतेचे ढीग साचले आहेत.
दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली असून आगारातील स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आगारातील काही मुजोर अधिकारी आणि आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर यांच्याकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरून त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.२२ ऑक्टोबर २०२६ पूर्वी वाहक गिलकेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास आणि प्रवाशांच्या मूलभूत मागण्या मान्य न झाल्यास श्रीगोंदा बस आगाराच्या प्रवेशद्वारावर तीव्र, बेमुदत उपोषण छेडले जाईल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा एसटी वाहतूक ठप्प झाल्यास त्याची संपूर्ण प्रशासकीय आणि नैतिक जबाबदारी आगार व्यवस्थापक (DM) प्रणव भापकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहील,असा सज्जड इशारा आंदोलकांनी दिला आहे.या तक्रारीच्या प्रती परिवहन आयुक्त,कामगार आयुक्त,व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याला कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
