स्वामी भक्तांचा महासंकल्प पूर्ण;अहिल्यानगरच्या बोल्हेगाव केंद्राची जागतिक विक्रमात बाजी!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राने (दिंडोरी प्रणित) एकाच वेळी तब्बल २७ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायणाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची ‘विनर्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद झाली असून, त्याचे प्रमाणपत्र केंद्राला नुकतेच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २६ जुलै २०२६ रोजी २५ हजार सामूहिक पारायणाचा संकल्प करण्यात आला होता. या उपक्रमाला अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे २५ हजारांऐवजी तब्बल २७ हजार भाविकांनी एकाच वेळी सामूहिक पठण करून नवा विक्रम रचला.केंद्राच्या पटांगणात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात ‘विनर्स बुक ऑफ इंडिया’चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी लोळगे काका आणि डॉ. हारके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. असा जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले आहे.या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी हरिदास कुमटकर, देवीदास जाधव, अभिजीत नरसाळे, संदीप दुधाडे, किरण भुसे, बाळासाहेब पोकळे, महेश गोसावी, महेश नारखेडे, सतीश अनाप, जालिंदर आरगडे, दीपक लांडे, यशवंत उंडे, सुभाष घोरपडे, आप्पासाहेब गांगुर्डे, लहू लोणकर, नानासाहेब खरात, बाबासाहेब गवांदे, सुरेश आदमाने यांच्यासह केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
