किराणा दुकानाच्या नावाखाली ‘हा’ मोठा काळा धंदा;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धाड,लाखोंचा मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर/संगमनेर (प्रतिनिधी):-संगमनेर शहरात किराणा दुकानाच्या आडून सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीच्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.राजापूर रोड परिसरातील एका दुकानावर आणि त्यासमोरील कारवर पोलिसांनी अचानक छापा टाकून तब्बल ५ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे कडक आदेश दिले आहेत.त्यानुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक दि.२७ नोव्हेंबर २०२६ रोजी संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते.यादरम्यान पथकाला गोपनीय माहिती मिळाली की,राजापूर रोडवरील ‘श्लोक किराणा दुकान’ येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष दुकानावर छापा टाकला.
दुकान आणि दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मारुती इको कारची झडती घेतली असता,पोलिसांना मोठा साठा आढळून आला.या कारवाईत पोलिसांनी दिनेश मच्छिंद्र शेलकर (वय ३८,रा. राजापूर रोड,संगमनेर) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून हिरा पानमसाला: २२,५६० रुपये किमतीचा साठा,डायरेक्टर स्पेशल पानमसाला २२,६८० रुपये किमतीचा साठा,सुगंधी तंबाखू १३,७४० रुपये किमतीचा साठा (वेगवेगळ्या बॅचमधील) व ५,००,००० रुपये किमतीची मारुती इको कार (क्र.एमएच-१७-सीएम-८४१३ असा एकूण मुद्देमाल: ५,५८,९८० रुपयेमुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपीला जप्त मुद्देमालासह संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.त्याच्याविरुद्ध गुरनं ११३८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे,अरुण गांगुर्डे, गणेश धोत्रे,गणेश लबडे, रणजीत जाधव आणि प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली आहे.
