तुक्कड ओढ्यात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणावर भिंगार कॅम्प पोलिसांची झडप..पळण्याच्या तयारीत असतानाच मुसक्या आवळल्या!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सोलापूर रोडवरील तुक्कड ओढा परिसरात धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.२१ नोव्हेंबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून,संशयिताविरुद्ध शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुक्कड ओढा (ता.जि. अहिल्यानगर) येथील दीपक राजेश बेरड (वय २८) याने आपल्या घराच्या पाठीमागे गवतात तलवार लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.माहितीची खातरजमा होताच त्यांनी तपास पथकातील पोलीस अंमलदार रवींद्र भास्कर टकले,दिलीप प्रकाश शिंदे आणि कैलास सायंबर यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करून कारवाईचे आदेश दिले.पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावला असता,संशयित हातात लोखंडी तलवार घेऊन येताना दिसला.पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला जागीच पकडले.
पंचासमक्ष झडती घेतल्यानंतर त्याच्याकडील धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.तलवार कशासाठी आणली याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ६०१/२०२६, आर्म ॲक्ट ४/२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात तसेच पोहेकाँ.दिलीप शिंदे,रवींद्र टकले आणि कैलास सायंबर यांच्या पथकाने पार पाडली.
