गोणीभर तंबाखू-पानमसाल्यासह मोपेडस्वार ‘बाबा’ चौकात जाळ्यात;स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..!
अहिल्यानगर (२५ नोव्हेंबर २०२६):-कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोड परिसरात अवैध सुगंधी तंबाखू आणि पानमसाला विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.२४ नोव्हेंबर २०२६ रोजी राबवण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीसह मोपेड आणि मुद्देमाल असा एकूण ७९,८७६ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.या पथकात पोलीस अंमलदार अभिजीत अरकल,रणजीत जाधव,अजिनाथ पाखरे आणि बाळासाहेब गुंजाळ यांचा समावेश होता.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पथक गस्त व माहिती संकलन करत असताना, जुना टाकळी रोड, गिरमेसिटी श्रीनगर,कोपरगाव रोडमार्गे मोपेडवरून सुगंधी तंबाखू आणि पानमसाला विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पथकाला मिळाली.
आरोपी मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पंचांच्या उपस्थितीत जुने टाकळी रोडवरील बाबा चौक,कोपरगाव येथे सापळा रचला.काही वेळातच संशयित मोपेडस्वार तिथे येताना दिसला.पथकाने त्याला अडवून तपासणी केली असता, त्याच्या मोपेडवरील गोणीमध्ये सुगंधी तंबाखू आणि पानमसाला आढळून आला.अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर जयराम ताकवले (वय २९, रा.सुभाषनगर, कोपरगाव, ता. कोपरगाव,जि. अहिल्यानगर) असे असून आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
