माजी नगरसेवकाचा चॉपरने हल्ल्याचा प्रयत्न;’संपवून टाका’ च्या धमकीने शहर हादरले?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील गजबजलेल्या मच्छी मार्केट परिसरात दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या कथित मारहाणीच्या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चॉपरसदृश धारदार शस्त्राने हल्ला करणे, दगडविटांनी मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित जखमी व्यक्ती कोठला स्टँडच्या दिशेने जात होती.त्यावेळी मच्छी मार्केट परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सुरुवातीला किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.मात्र,काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.वाद चिघळल्यानंतर माजी नगरसेवक सचिन जाधव यांनी आपल्या मोपेडच्या डिक्कीतून चॉपरसदृश धारदार शस्त्र काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.हा वार चुकविण्याचा प्रयत्न करताना जखमी व्यक्तीने आपला हात मध्ये घातला.यामध्ये त्यांच्या हाताला खोलवर आणि गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.हल्ल्याच्या या घटनेनंतर सचिन राऊत ऊर्फ नफऱ्या आणि नितीन सुरसे यांनीही दगडविटा तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.मारहाण सुरू असतानाच ‘याला संपवून टाका’ अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही जखमी व्यक्तीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाताला झालेल्या गंभीर जखमेवर टाके घालण्यात आले असून सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी माजी नगरसेवक सचिन जाधव,सचिन राऊत ऊर्फ नफऱ्या आणि नितीन सुरसे या तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माजी नगरसेवकाचे नाव या प्रकरणात समोर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मच्छी मार्केटसारख्या वर्दळीच्या परिसरात मध्यरात्री घडलेल्या या कथित घटनेमुळे शहरातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तक्रारीतील आरोपांची सत्यता काय आहे आणि नेमकी कारणे काय होती,याचा पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
