फॉरेक्स ट्रेडिंगचा तोटा लपवायला रचला ‘फेक’ घरफोडीचा डाव; चार तासांतच ‘तक्रारदारच चोर’ निघाला..कोतवाली पोलिसांनी अवघ्या चार तासातच गुन्ह्याची केली उकल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्वतःच तक्रारदार आणि स्वतःच चोर,असा अजब प्रकार कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे.फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गमावलेले पैसे मिळवण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्याच घरात घरफोडी झाल्याचा बनाव रचला.मात्र,कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत या प्रकरणाचा छडा लावत फिर्यादीलाच बेड्या ठोकल्या आहेत.आदर्श ज्ञानदेव तनपुरे (वय २५,रा. तानाजी मालुसरे अपार्टमेंट, मराठानगर,केडगाव, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.१७ नोव्हेंबरच्या रात्री ११.१५ ते १८ नोव्हेंबरच्या सकाळी ८.०० वाजेदरम्यान घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून १ लाख २५ हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार त्याने १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०५ वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(३)(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक.नितीन देशमुख यांनी सपोनि.विशाल गोविंद चिटणीस आणि गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले.पथकाने घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज,डॉग स्कॉड,फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक युनिटच्या मदतीने तपासणी सुरू केली. तपासादरम्यान फिर्यादीच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला.तो ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग करत असल्याची गोपनीय माहितीही पोलिसांना मिळाली.पोलिसांनी आदर्श तनपुरे याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यानेच हा बनाव रचल्याची कबुली दिली.आई दिवाळी निमित्त माहेरी गेल्यावर त्याने घरात ठेवलेली १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने काढून आपल्या एचडीएफसी बँक खात्यात जमा केली.
त्यानंतर त्याने ‘XM’ या डीमॅट खात्याद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली.या व्यवहारात मोठे नुकसान झाल्याने घरच्यांना काय उत्तर द्यावे,या भीतीपोटी त्याने घरफोडीचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले.बँक खात्याचा तपशील आणि जप्त केलेल्या मोबाईलमधील ‘XM’ डीमॅट खात्याच्या नोंदींमधूनही ही बाब स्पष्ट झाली.त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीलाच १८ नोव्हेंबर रोजी अटक केली असून,न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सपोनि.विशाल गोविंद चिटणीस,पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड,शाबीर शेख,विनोद बोरगे, विशाल दळवी,संदीप शिरसाट, सत्यजित शिंदे,सुरज कदम, शिरीष तरटे,अतुल कोतकर, रमेश शिंदे,अतुल लाटे,संकेत धीवर,वैभव काळे,आकाश काळे यांनी केली आहे.
