स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..येथील ४ अवैध बिंगो जुगार अड्ड्यांवर छापा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कडक आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत अवैध बिंगो जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.नेवासा आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी एकूण १ लाख २८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्या होत्या.त्यानुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.हरिष भोये व पोलीस अंमलदारांची दोन विशेष पथके तयार करून रवाना करण्यात आली होती.
दि.१५ नोव्हेंबर २०२६ रोजी या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे नेवासा येथे १ तर श्रीगोंदा येथे ३ अशा एकूण ४ अवैध बिंगो जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ही कारवाई यशस्वी केली.सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सपोनि.हरिष भोये आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,अरुण गांगुर्डे,अशोक लिपणे, शामसुंदर जाधव,मनोज साखरे,अतुल लोटके,बिरप्पा करमल,रोहित मिसाळ व प्रताप देवकाते यांच्या पथकाने केली आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
