मा.सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या दिमाखदार आयोजनात गोरेगावच्या महिलांचा जल्लोष;वैशाली तांबे ठरल्या मानाच्या होम मिनिस्टर!
गोरेगाव (प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि दैनंदिन धावपळीतून एक दिवस स्वतःसाठी आनंदाने जगता यावा,या उद्देशाने सोशल फाउंडेशनच्या वतीने मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात वैशाली संदीप तांबे यांनी बाजी मारत गोरेगावच्या मानाच्या होम मिनिस्टर होण्याचा बहुमान पटकावला. त्यांनी मानाची पैठणी आणि सोन्याची नथ जिंकत उपस्थितांची वाहवा मिळवली.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक,सेलिब्रिटी अँकर व सिनेअभिनेते ओम यादव यांच्या बहारदार सूत्रसंचालनात रंगलेल्या या कार्यक्रमाला पारनेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते सर तसेच पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वसंतराव चेडे दादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.रात्री साडेसात वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सलग पहाटे दोन वाजेपर्यंत रंगला. ग्रामीण भागातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.ओम यादव यांनी आपल्या तुफान विनोदी शैलीने आबालवृद्धांना खळखळून हसवले.त्यांच्या विनोदांनी संपूर्ण परिसर हास्यकल्लोळात न्हाऊन निघाला. पुढील वर्षीही हाच कार्यक्रम आयोजित करावा,अशी उत्स्फूर्त मागणी प्रेक्षकांमधून करण्यात आली.कार्यक्रमात महिलांसाठी पिठाची गिरणी, एलईडी टीव्ही, इंडक्शन शेगडी, गॅस शेगडी, कुलर, प्रेशर कुकर, भिंतीवरील घड्याळ, मिक्सर, सिलिंग फॅन यांसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल ५० बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या १००० हून अधिक महिला भगिनींना वाणाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांच्या आनंदात आणखी भर पडली.यावेळी सरपंच सुमनताई तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागातील महिला भगिनींना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आयुष्यातील किमान एक दिवस त्यांनी स्वतःसाठी आनंदाने जगावा, या प्रामाणिक उद्देशाने गेल्या सलग पाच वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच या आयोजनाची खरी प्रेरणा असून भविष्यातही ही परंपरा कायम सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.अभिनेते ओम यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्यभरात पाच हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. मात्र गोरेगावमधील महिला भगिनींचा उत्साह, कलेची जाण आणि कार्यक्रमातील सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील महिला इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंप्रेरित, स्वावलंबी आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. सोशल फाउंडेशनचे नियोजन अतिशय अचूक व शिस्तबद्ध असून येथील सर्व माणसे प्रेमळ आहेत. आपल्या माणसांमध्ये आल्याचा आनंद आणि वेगळाच अनुभव मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आमदार काशिनाथ दाते यांनी मॉडेल व्हिलेज गोरेगावबद्दल आपले पहिल्यापासून विशेष प्रेम आणि जिव्हाळा असल्याचे सांगितले. जिल्हापरिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून बोलावतात आणि आपणही आवर्जून उपस्थित राहतो. सभापती पदाच्या कार्यकाळात तसेच आमदारकीच्या काळात गोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. आगामी काळातही या विकासकामांची यादी दुप्पट होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या सरपंच सुमनताई तांबे, उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे, सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी तसेच गावातील असंख्य ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले. प्रितेश पानमंद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सरपंच सुमनताई तांबे यांनी महिला भगिनींचे स्वागत करून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.महिलांचा प्रचंड उत्साह, आकर्षक बक्षिसांची रेलचेल, अभिनेते ओम यादव यांचे बहारदार सादरीकरण आणि सोशल फाउंडेशनचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा सोहळा गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमधील एक अविस्मरणीय पर्व ठरला.
