डुप्लिकेट लेटरहेड वापरून सायबर ठगांनी लाटले साडेतेरा लाख,सायबर पोलिसांनी फिरली चक्रं फिर्यादीचे पैसे परत..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर एका सायबर फसवणुकीच्या प्रकरणातील तब्बल १३ लाख ५६ हजार १५७ रुपये (तेरा लाख छप्पन्न हजार एकसष्ठ रुपये) पूर्ण रक्कम फिर्यादीला सुखरूप परत मिळवून देण्यात यश आले आहे.फिर्यादी यांची एक कंपनी असून,ती मोठ्या ग्राहक कंपन्यांना माल व वस्तू पुरवठा करते.या ग्राहकाकडून फिर्यादीच्या कंपनीचे पेमेंट येणे बाकी होते.दरम्यान,अज्ञात सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीच्या कंपनीची ई-मेल आयडी हॅक केली.गुन्हेगारांनी कंपनीच्या हुबेहूब लेटरहेडचा वापर करून व बँकेचे तपशील बदलून बनावट चेक तयार केला.त्यानंतर तो ई-मेलद्वारे ग्राहक कंपनीला पाठवून बँक खात्यातील बदललेल्या तपशिलावर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले.यावर विश्वास ठेवून ग्राहक कंपनीने दोन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये एकूण १३,५६,१५७/- रुपयांची रक्कम पाठवली.मात्र,ही रक्कम फिर्यादीच्या मूळ खात्यात न जाता सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बनावट खात्यात जमा झाली,ज्यामुळे फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली.घटना गांभीर्याने लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली आणि संबंधित बँकांशी समन्वय साधत पाठपुरावा केला.अथक प्रयासानंतर फसवणुकीची संपूर्ण रक्कम फिर्यादी यांना सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात आली.
या प्रकरणातून सायबर गुन्ह्यांमध्ये वेळ न घालवता तात्काळ तक्रार नोंदवणे आणि बँकांशी संपर्क साधणे किती महत्त्वाचे आहे,हे सिद्ध होते.सायबर गुन्हेगारांकडून ई-मेल हॅक करून बनावट लेटरहेड व बँक खात्याचे तपशील बदलून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीने ई-मेलद्वारे बँक खाते बदलण्याच्या सूचनेवर विश्वास न ठेवता,प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत.फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी,असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे,पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब हिंगे व इतर अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.
