महापालिका प्रशासनाची कठोर पावले उचलण्यास सुरुवात..शहरातील ‘या’ ठिकाणी पाण्याची नासाडी करणाऱ्या एकास दोन हजार रुपयांचा दंड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.शहरातील सुडके मळा परिसरात पाण्याच्या अपव्ययाप्रकरणी थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली असून,गणेश आव्हाड नागरिकाला तब्बल २,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.या कारवाईमुळे नागरिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.महानगरपालिकेच्या वतीने पाण्याची होणारी नासाडी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.सुडके मळा परिसरामध्ये राहणाऱ्या एका नागरिकाकडून पाण्याचा अपव्यय (अयोग्य वापर) होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तातडीने पावले उचलली.महानगरपालिकेच्या सामान्य पावती क्रमांक ६२१५३ द्वारे संबंधित व्यक्तीवर थेट २,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, तशी अधिकृत पावती देखील जारी करण्यात आली आहे.
उन्हाळा असो वा इतर ऋतू, शहरात पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर आता कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही,असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.नळाला पाईप न लावणे, वाहनांची अनावश्यक धुलाई करणे किंवा पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणे यांसारख्या गोष्टी आता नागरिकांना चांगल्याच महागात पडू शकतात.या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
