दिवाळीत ‘माणुसकीचा प्रकाश’! दात्यांच्या सहकार्याने अहिल्यानगरमध्ये गरजूंच्या दारी पोहोचला आनंदाचा शिधा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा लखलखाट नव्हे,तर तो आहे अंधःकारात हरवलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची वात पेटवण्याचा सण हाच खरा सणांचा गोडवा अनुभवत, अहिल्यानगरमध्ये ‘हरे कृष्ण सत्संग केंद्र’, ‘श्री लक्ष्मी नारायण सामाजिक बहुउद्देशीय संस्था’ आणि मित्र परिवाराच्या वतीने समाजातील गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करत अनोख्या दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.सणासुदीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये किंवा आनंदापासून वंचित राहू नये,या उदात्त भावनेतून प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट सुपूर्द करण्यात आले.
यामध्ये आटा,तांदूळ,साखर,खाद्यतेल,डाळ आणि शेंगदाणे या साहित्याचा समावेश होता.या सामाजिक उपक्रमाला सढळ हाताने मदत करत,गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी बाली जोशी,गिरीश जोशी (बन्सी महाराज),पियुष संचेती,गिरीश ओझा,निलेश लोढा,किशोर बेंद्रे,उमेश झेंडे,अक्षय भिंगारे,भारत थोरात या दात्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.समाजातील प्रत्येक घटकाने केवळ स्वतःचा विचार न करता,आपल्या आसपासच्या गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी पुढे यावे,हाच या उपक्रमामागील मुख्य संदेश होता.माणुसकीचा हा मलम आणि आपुलकीचा हात अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद देऊन गेला.
