रिलायन्स स्मार्ट बाजार घरफोडीचा एलसीबी कडून पर्दाफाश! मुद्देमाल असा लागला हाताला;मास्टरमाइंड निघाला तेथील जुनाच कर्मचारी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सावेडी येथील रिलायन्स स्मार्ट बाजार फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोरांचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांतच छडा लावला आहे.या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना बेड्या ठोकून तब्बल ८,२४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावेडीच्या रिलायन्स स्मार्ट बाजारच्या सर्व्हर रूमची खिडकी आणि काच फोडून अज्ञात चोरांनी कॅश रूममधील तिजोरी सुरक्षितपणे तोडली आणि ४,६६,३९०/- रुपये रोख लांबवले.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोउपनि कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार संदिप पवार,शाहीद शेख,सागर ससाणे,बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांच्या पथकाला तपासाकामी रवाना केले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२,रा. मनोनिला नगर,बोल्हेगाव) आणि सुधीर दिनकर घोडके (वय ३९,रा.मातोश्री अपार्टमेंट,पवन नगर,भिस्तबाग,सावेडी) यांना ताब्यात घेतले.तपासात आरोपी विशाल चेमटे हा दोन वर्षांपूर्वी याच रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये कामाला होता,हे निष्पन्न झाले.त्याला दुकानातील पैशांच्या व्यवहाराची खडानखडा माहिती होती.आरोपींनी रेनॉल्ड कंपनीची क्विड कार व यामहा मोटारसायकलवरून येऊन हा गुन्हा केल्याची माहिती दिली.ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले असून, गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या वेगाने केलेल्या कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.
