स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई! प्रवाशांच्या पर्स चोरणारी महिलांची कुख्यात टोळी जेरबंद,तर सोनईत कत्तलीसाठी डांबलेली ८ गोवंशीय जनावरे हस्तगत..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या सख्त निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एकापाठोपाठ एक अशा दोन धडक कारवाया करत गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.प्रवासादरम्यान महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणारी आंतरजिल्हा महिला चोरांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून,दुसरीकडे सोनई परिसरात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ८ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.२४ जुलै २०२६ रोजी फिर्यादी बसमध्ये चढत असताना अज्ञात महिला चोरांनी त्यांच्या पर्समधून ३,६०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले होते.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी शिल्पा प्रशांत चव्हाण (वय २२,रा.निपाणी वडगाव,ता.पाथर्डी) हिस माळीवाडा बसस्टँड येथून ताब्यात घेतले.तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या इतर ५ साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली.पथकाने तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ६,११,०००/- रुपये किमतीचे ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने यशस्वीरित्या जप्त केले आहेत.या टोळीतील इतर महिला आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
कारवाई २: सोनई येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ८ गोवंशीय जनावरांची सुटका
दुसऱ्या
कारवाईत,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना,चांदा गावामध्ये अयनाज मोबीन शेख याने त्याच्या साथीदारांसह गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी शेडच्या आडोशाला आणि काटवनात डांबून ठेवल्याची गोपनिय माहिती मिळाली.पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकून १,१५,०००/- रुपये किमतीची ८ गोवंशीय जनावरे सुखरूप ताब्यात घेतली. याप्रकरणी आरोपी अयनाज मोबीन शेख,आशकान अमिन शेख,नबाब गुलाब शेख (सर्व रा.चांदा,ता.नेवासा) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,फरार आरोपींचा शोध सुरू आहे.वरील दोन्ही यशस्वी कारवाया पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले,विकास साळवे,भगवान सानप,बाळासाहेब खेडकर, सतीश भवर,प्रशांत राठोड,महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे,किरण ठुबे,अरुण गांगर्डे,बाळासाहेब नागरगोजे,अशोक लिपणे,शामसुंदर जाधव,मनोज साखरे,अमोल कोतकर,किशोर शिरसाठ यांनी केली आहे.
