वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात बिबट्याचा मुक्तसंचार;नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहराच्या मध्यवर्ती भागात,थेट महापालिकेला लागून असलेल्या लष्करी कार्यालयाच्या मागे बिबट्याने पाऊल ठेवल्याचे उघडकीस आले असून,या थरारक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.मात्र,या सर्व प्रकारामागे वनविभागाचा गाफीलपणा आणि अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.वारंवार वन्यप्राण्यांचे नागरिकांच्या वस्तीत शिरकाव होत असतानाही वनविभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न असून, त्यांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.आज १५ नोव्हेंबर रोजी ही भयंकर घटना उजेडात आली.शहराच्या मध्यवर्ती भागात वन्यप्राण्यांचा वावर असल्याची कुणकुण लागल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने तपासणी केली असता,महापालिकेजवळील लष्करी कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्या विनासायास वावरत असल्याचे स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाले.
दाट नागरी वस्तीत असा भक्षक राजरोसपणे फिरत असतानाही वनविभागाला याची साधी कुणकुणही लागली नाही,हे त्यांच्या यंत्रणेचे मोठे अपयश दर्शवते.शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी बिबट्या पोहोचल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.वनविभागाच्या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळेच बिबट्या थेट शहराच्या छाताडावर येऊन ठेपल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.वनअधिकारी केवळ घटना घडल्यानंतर वरवरची नौटंकी करतात,पण ठोस उपाययोजना करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही,तोपर्यंत वन विभाग गाढ झोपेतून जागी होणार का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
