घरातून गांजा विक्रीचा पर्दाफाश;स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कुकाणा ता. नेवासा येथे स्वतःच्या घरातून बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून ताब्यात घेतले आहे.ही कारवाई १९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली असून,यामध्ये तब्बल ११.१८२ किलो गांजा आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ५,६०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात गांजा पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले असून,नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती संकलित करत होते.१९ नोव्हेंबर २०२६ रोजी कुकाणा येथील मुलाणीवाडा (जुम्मा मशीदजवळ) भागात शाहमद मेहबुब शेख याच्या घरात गांजा साठवून विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.माहितीची खातरजमा करून नेवासा पोलिसांना लेखी अहवाल देण्यात आला.त्यानंतर शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार नेवासा पोलीस ठाण्याचे सपोनि.अमोल पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत शाहमद मेहबुब शेख (वय ४८) याच्या घराची झडती घेतली. घरात गांजा आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशी दरम्यान शाहमद शेख याने हा गांजा मजलेशहर (ता.शेवगाव) येथील मल्हारी मोहन बोरूडे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पथकाने शोध घेऊन दुसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेतले.दोन्ही आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी नेवासा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९४८/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ च्या कलम ८(क), २०(ब) आणि २०(२)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अमोल पवार,सपोनि हरिष भोये तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे,रिचर्ड गायकवाड,विकास साळवे, अशोक लिपणे,शामसुंदर जाधव,मनोज साखरे आणि नंदिनी झिने यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
