न्युरोसर्जरीपासून स्त्रीरोगापर्यंत…आता आरोग्यविषयक गैरसमज दूर होणार थेट संवादातून;खराडीत ‘माईंडक्राफ्ट’ स्टुडिओ दिमाखात सुरू..!
खराडी (प्रतिनिधी):-आधुनिक काळात संवाद,शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खराडी येथील सिटी व्हिस्टा,अशोका नगर येथे ‘माईंडक्राफ्ट’ पॉडकास्ट अँड सोशल मीडिया स्टुडिओचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडला.सुप्रसिद्ध कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाईन सर्जन डॉक्टर सचिन चेमटे पाटील आणि कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टर स्नेहा बल्की-चेमटे यांच्या संकल्पनेतून हा अत्याधुनिक स्टुडिओ साकारण्यात आला आहे.या स्टुडिओच्या माध्यमातून वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः न्युरोसर्जरी तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयांबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आरोग्यविषयक गैरसमज दूर करणे आणि योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे डॉक्टर सचिन चेमटे पाटील व डॉक्टर स्नेहा बल्की-चेमटे यांनी यावेळी सांगितले.या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेंद्र पठारे आणि नगरसेविका ऐश्वर्या पठारे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फित कापून स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी डॉक्टर दाम्पत्याच्या या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला परिसरातील डॉक्टर, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक डिजिटल माध्यमांचा उपयोग करून आरोग्य व सामाजिक विषयांवरील माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘माईंडक्राफ्ट’ हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
