डोक्यात दगड घालून निर्घृण खून,मग पुलाखाली फेकून अपघाताचा बनाव;नगर तालुक्यात खळबळजनक थरार!
अहिल्यानगर (महाराष्ट्र न्यूज 24):-नगर तालुक्यात रतडगाव शिवारात डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रतडगाव येथील पुलाखाली टाकून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सुभाष बाबासाहेब जगताप (वय ३५, रा.रतडगाव,ता.जि. अहिल्यानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रतडगाव परिसरात घडलेल्या या खून व पुरावा नष्ट करण्याच्या घटनेमुळे तालुयात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी युवराज अंबादास जगताप (वय २८, मूळ रा.रतडगाव,सध्या रा. केडगाव,ता.जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी अमोल सोपान जाधव (रा.रतडगाव,ता.जि. अहिल्यानगर) या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.ही घटना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रतडगाव शिवारातील इनरकॉन कंपनीच्या कार्यालयाजवळ बाभळीच्या झाडाखाली घडली.
आरोपीने अज्ञात कारणावरून सुभाष जगताप यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.खून केल्यानंतर प्रकारावर पांघरूण घालण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रतडगाव येथील पुलाखाली नेऊन टाकण्यात आला.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे,पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.
