धर्मवीर गडाचा जाज्वल्य इतिहास आता ग्रंथरूपात! काजल जंजिरे लिखित ‘धर्मवीर गड’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याची साक्ष देणाऱ्या पेडगाव (ता.श्रीगोंदा) येथील ऐतिहासिक ‘धर्मवीर गड’ किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास आणि स्थापत्य वैभव आता नव्या पिढीसमोर ग्रंथरूपात उलगडणार आहे.पेडगावच्या रहिवासी असलेल्या लेखिका व प्रसिद्ध वास्तुविशारद काजल महेश जंजिरे लिखित ‘धर्मवीर गड’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते किल्ल्याच्या ऐतिहासिक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
“इतिहास जतन करणे म्हणजे सत्य आणि स्मृतींचे संरक्षण” — काजल जंजिरे
प्रकाशन सोहळ्यात बोलताना लेखिका काजल जंजिरे यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला.त्या म्हणाल्या की,”इतिहास जतन करणे म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचे संरक्षण करणे नव्हे,तर त्यांच्याशी संबंधित सत्य,स्मृती आणि सांस्कृतिक संदर्भ यांचेही जतन करणे होय. त्यासाठी ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनाविषयी समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.”
हे पुस्तक छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि धर्मवीर गडाचा ऐतिहासिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणारे एक सक्षम माध्यम ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या या यशात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) सहाय्यक कमांडंट असलेले पती महेश ईश्वर जंजिरे यांचा भक्कम पाठिंबा आणि सासू-सासरे व आई-वडिलांच्या आशीर्वादाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
राज्यातील सर्व आमदारांपर्यंत पुस्तक पोहोचविणार आ.हेमंत ओगले
आमदार हेमंत ओगले यांनी आपल्या गावच्या सुनेच्या या साहित्यिक कामगिरीचे विशेष कौतुक केले. “पेडगावच्या सूनबाई सौ. काजल यांनी शब्दबद्ध केलेले ‘धर्मवीर गड’ हे पुस्तक राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांपर्यंत पोहोचवून या गडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि संभाजी महाराजांचे शौर्य संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणू,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार ओगले यांनी केली.
काष्टीच्या लेकीचा अभिमान; गडाच्या संवर्धनासाठी भरीव निधी आणणार आ. विक्रमसिंह पाचपुते
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आपल्या काष्टी गावची सुकन्या असलेल्या काजल जंजिरे यांचा ‘सिद्धहस्त लेखिका, चाणाक्ष संशोधक आणि उत्कृष्ट वास्तुविशारद’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पुढे बोलताना आ. पाचपुते म्हणाले की, “धर्मवीर गडाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी आणण्यासाठी आपण विशेष पुढाकार घेतला असून, या ऐतिहासिक वारशाला त्याचे गतवैभव नक्कीच प्राप्त करून देऊ.”
दिग्गजांची उपस्थिती आणि गडभ्रमंती निर्मिती व सहकार्य: गणराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार व मुंबई उच्च न्यायालयातील वकील डॉ. बाळासाहेब बोठे पाटील यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रा.गणेश भगत,ज्येष्ठ संपादक जयंतराव देशपांडे आणि गणेशसेठ दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते अॅड. डी. डी. घोरपडे, इतिहासकार प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, मसापचे विभागीय अध्यक्ष जयंत येलूलकर, कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंतराजे गायकवाड आणि सरपंच इरफानभाई पिरजादे यांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. डॉ. बाळासाहेब बोठे पाटील यांनी केले,खुमासदार सूत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. गणेश भगत यांनी मानले. सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि राज्यभरातून आलेल्या विविध खात्यांतील अधिकाऱ्यांनी धर्मवीर गडाच्या सुमारे ९० एकर परिसरातील वास्तू, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वारशाची प्रत्यक्ष पाहणी केली.
