एलसीबीचे एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक ३७ ठिकाणी छापे..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी कंबर कसली असून,स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवसात जिल्ह्यात ३७ ठिकाणी धडक छापे टाकून अवैध व्यावसायिकांना मोठा दणका दिला आहे.मंगळवारी (दि.२५ नोव्हेंबर) रोजी करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई करत एकूण १ लाख ८८ हजार ३८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्यानुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहा विशेष पथके तयार करून त्यांना जिल्ह्यातील विविध भागात रवाना केले.या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धडक मोहीम राबवली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे,अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,विष्णू भागवत, सोमनाथ झांबरे,निळकंठ कारखेले,भगवान सानप, किशोर शिरसाठ,योगेश कर्डिले,अतुल लोटके,अमोल आजबे,प्रकाश मांडगे,रोहित मिसाळ,संभाजी कोतकर, विजय पवार,अभिजीत अरकल,बाळासाहेब गुंजाळ, अजिनाथ पाखरे,रिचर्ड गायकवाड,भिमराज खर्से, सुनील मालणकर,भगवान थोरात,राहुल डोके आणि रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
