अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महानगरपालिकेचे महत्त्वाचे पाऊल..४ नव्या बुलेट मोटारसायकली दाखल,आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम,गतिमान आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासाठी नव्याने दाखल झालेल्या चार बुलेट मोटारसायकलींचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या शुभहस्ते या चार बुलेट मोटारसायकलींचे लोकार्पण करण्यात आले.शहरातील आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यासाठी या मोटारसायकली उपयुक्त ठरणार आहेत.महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन), महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून या चार बुलेट मोटारसायकली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी तसेच गर्दीच्या भागांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या वाहनांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येऊ शकतात.अशा वेळी बुलेट मोटारसायकलींच्या माध्यमातून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जलद पोहोचणे आणि परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे.आग लागणे, अपघात,नैसर्गिक आपत्ती अथवा अन्य आपत्कालीन प्रसंगांमध्ये सुरुवातीच्या काही मिनिटांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे अग्निशमन विभागाची प्रतिसाद क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक साधनसामग्री आणि आवश्यक वाहनांची उपलब्धता महत्त्वाची ठरते.नव्याने दाखल झालेल्या या मोटारसायकलींमुळे अग्निशमन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार असून, शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.
या लोकार्पण सोहळ्यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे,महापौर ज्योतीताई गाडे,उपमहापौर ॲड.धनंजय जाधव,स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, बालकल्याण समिती सभापती दीपालीताई बारस्कर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर,नगरसेवक सुरेश बनसोडे,महेश लोंढे,अनिल बोरुडे,बाबासाहेब वाकळे, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागासाठी उपलब्ध झालेल्या चार बुलेट मोटारसायकलींमुळे आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
