‘या’ तालुक्यात वाळू तस्करांवर एलसीबीचा मोठा हातोडा;५ जण जेरबंद,१ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तस्करांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतर फरारांचा शोध सुरू आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विकास जाधव आणि अंमलदारांचे पथक पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्ता
टाकळी ढोकेश्वर ते पारनेर रस्त्यावरून डंपरमधून चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.पोलिसांनी तत्काळ सापळा रचून तीन डंपर अडवले.तपासणीत अवैध वाळू मिळून आल्याने पोलिसांनी तीन डंपर आणि वाळूसह सुमारे ६० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी अक्षय बाबा जेडगुळे (वय २९,रा.वासुंदे), गोरख सखाराम मधे (वय २४, रा.शिखरी वासुंदे),ऋतीक भाऊसाहेब टोपले (वय २४, रा.वासुंदे) यांना ताब्यात घेण्यात आले असून प्रशांत भिकाजी वाळुंज (रा. काकणेवाडी) व चैतन्य डुमरे (रा.ओतूर,जि.पुणे) हे दोघे फरार आहेत.तसेच दुसऱ्या कारवाईत खडकवाडी शिवारात नदीपात्रात छापा
दुसऱ्या एका गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने खडकवाडी शिवारातील बोरवाक नदीच्या ओढ्याकाठी छापा टाकला.तेथे जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जेसीबी, सोनालिका ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) आणि वाळू असा ५६ लाख ०५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत योगेश बाळू उघडे (वय २८,रा. वनकुटे) आणि ओंकार रावसाहेब गोर्डे (वय २२,रा. टाकळी ढोकेश्वर) यांना ताब्यात घेण्यात आले;तर ओंकार बोरूडे,सुधीर शिंगोटे, अमोल आल्हाट आणि रोहित साळवे हे पसार झाले आहेत.
दोन्ही कारवायांमध्ये पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३ व १५ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे (गु.र.नं. ८२८/२०२६ आणि ८२९/२०२६) दाखल करण्यात आले आहेत.ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि विकास जाधव, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे,शाहीद शेख,पंकज व्यवहारे,अमोल आजबे,अतुल लोटके,विष्णू भागवत,अशोक लिपणे आणि रोहित येमुल यांच्या पथकाने केली. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे पारनेर तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
