स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई:पाथर्डीत अवैध वाळू वाहतुकीवर छापा तर नगर, संगमनेरात कत्तलखान्यांवर कारवाई;४० गोवंशांची सुटका व सुमारे ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम राबवत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत.यामध्ये पाथर्डी तालुक्यात अवैध वाळू वाहतूक पकडण्यात आली,तर तोफखाना आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध कत्तलखान्यांवर छापे टाकून गोवंशांची सुटका करण्यात आली.दोन्ही कारवायांमध्ये मिळून सुमारे ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून ही कारवाई करण्यात आली.
१.पाथर्डी तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर छापा:२० लाखांचा मुद्देमाल जप्त
दि.१७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, भगवान सानप,योगेश कर्डीले व बाळासाहेब खेडकर यांचे पथक पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोधेगाव ते कोरडगाव रोडवर सापळा लावला.यावेळी संशयित हायवा थांबवून तपासणी केली असता त्यात विनापरवाना अवैध वाळू मिळून आली.
या कारवाईत पोलिसांनी भरत दादाराव मारनोर (वय २५,रा. बाग पिंपळगाव,ता.गेवराई, जि.बीड) यास ताब्यात घेतले. चौकशीत हा हायवा अभिषेक प्रकाश सोनवणे (रा.आगर नांदूर,ता.गेवराई,जि.बीड – फरार) याच्या मालकीचा असल्याचे समोर आले.पोलिसांनी २० लाख ६० हजार रुपये किमतीचा एमएच-४८-सीक्यू-२१६२ क्रमांकाचा हायवा व वाळू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२५१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) सह पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२.नगर व संगमनेरमध्ये कत्तलखान्यांवर छापे:४० गोवंशांची सुटका,४०० किलो गोमांस जप्त
दुसऱ्या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार संदिप पवार,शाहीद शेख,अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, बाळासाहेब नागरगोजे, अभिजीत अरकल,अजिनाथ पाखरे,रणजीत जाधव व रमीझराजा आत्तार यांच्या पथकांनी दि.१८ ऑक्टोबर रोजी तोफखाना आणि संगमनेर शहर हद्दीत तीन ठिकाणी छापे टाकले. तोफखाना हद्दीत छापा टाकून ८१,९०० रुपये किमतीचे ४०० किलो गोमांस,सत्तूर,सुरा व वजन काटा जप्त करण्यात आला.याप्रकरणी मोईन आरीफ कुरेशी (वय २५, रा. पिरशाहखुंट,अहिल्यानगर) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (गु.र.नं. ८७०/२०२६ BNS कलम २७१, २२३, ३(५) सह म.पशुसंरक्षण कायदा ५, ९).
संगमनेर कारवाई (गु.र.नं. ९७४/२०२६): ४ लाख रुपये किमतीची १४ लहान-मोठी गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.यामध्ये बुड्डी कुरेशी (फरार), शमशु कुरेशी (फरार,दोन्ही रा.मदिनानगर, संगमनेर) आणि बुंदी कुरेशी (रा.भारतनगर,संगमनेर) यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला.संगमनेर कारवाई (गु.र.नं. ९७५/२०२६): ६ लाख ६० हजार रुपये किमतीची २६ लहान-मोठी गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली.याप्रकरणी बुंदी कुरेशी (रा. भारतनगर) व बुड्डी कुरेशी (फरार, रा. मदिनानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.अवैध कत्तलखान्यांवरील कारवाईत एकूण ११ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे.
ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
