रंगणार ‘जागर नारी शक्तीचा’ दांडिया नाईट; महिला घेणार पर्यावरण संवर्धनाची शपथ
उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून ‘जागर नारी शक्तीचा – दांडिया नाईट २०२६’ (व्हॉल्यूम ८.०) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा रविवार,१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नगर-शिर्डी रस्त्यावरील दत्तात्रय जाधव नगर येथील ‘बंधन लॉन्स अँड रिसॉर्ट’ येथे रंगणार असून,सांस्कृतिक जल्लोषासोबतच सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम यात पाहायला मिळणार आहे.पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ या महोत्सवादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतील ‘ग्रीन सिटी’ (हरित शहर) मोहिमेचा प्रचार-प्रसार केला जाणार आहे.अहिल्यानगरला हरित,स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी उपस्थित सर्व महिलांना पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ दिली जाईल. या कार्यक्रमास आमदार संग्राम भैय्या जगताप,’रणरागिणी मंडळा’च्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिलांसाठी मोफत प्रवेश व आकर्षक बक्षिसे
महिलांसाठी पूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या दांडिया नाईटमध्ये सुसज्ज डान्स फ्लोअर, दर्जेदार गरबा परफॉर्मन्स आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध असतील. उत्कृष्ट गरबा सादरीकरणासाठी ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट दांडिया क्वीन’ आणि ‘बेस्ट कॉस्ट्युम’ अशा विविध श्रेणींमध्ये विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.सोमनाथ जाधव,दिनेश फिरके व सहकाऱ्यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या भव्य दांडिया नाईटमध्ये अहिल्यानगर शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमहापौर ॲड.धनंजय जाधव यांनी केले आहे.
