‘त्या’ चपलाच्या दुकानातून गांजा विक्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकताच उडाली एकच खळबळ..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दुकान चपला-बुटांचे,पण आतमध्ये चालणारा काळा धंदा पाहून खुद्द पोलीसही अचंबित झाले.श्रीगोंदा शहरातील गोदडे महाराज मठाजवळील ‘साईसेवा फुटवेअर’ या दुकानातून चक्क गांजाची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त छापा टाकून या गोरखधंद्याचा पर्दाफाश केला असून दुकानातून लाखांचा गांजा जप्त केला आहे.जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सपोनि. हरिष भोये व पोलीस अंमलदार बिरप्पा करमल,प्रताप देवकाते,अमोल कोतकर,बाळासाहेब गुंजाळ,सतीष भवर,भगवान धुळे यांचे तपास पथक तयार करून रवाना केले होते.दि.१५ ऑक्टोबर रोजी हे पथक श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना,लोहार गल्लीतील सागर अविनाश बोराडे (वय ३४) हा गोदडे महाराज मठाजवळील ‘साईसेवा फुटवेअर’ दुकानातून गांजा विक्री करत असल्याची पक्की माहिती मिळाली. पथकाने तत्काळ ही माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना कळविली.उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत उपविभाग) यांच्या आदेशान्वये,श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सपोनि. कौशलरामनिरंजन वाघ,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार शोभा कुरूळे यांनी पंचांसह शासकीय वाहनाने थेट ‘साईसेवा फुटवेअर’वर धाड टाकली.
दुकानाची पंचांसमक्ष कसून झडती घेतली असता,एका कापडी पिशवीमध्ये तब्बल २ किलो १६७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.पोलिसांनी १,०८,३५० रुपये किमतीचा गांजा आणि ५० रुपयांची कापडी पिशवी असा एकूण १,०८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी सागर अविनाश बोराडे याला जागीच ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपी सागर बोराडे याच्याकडे कसून चौकशी केली असता, हा गांजा त्याने अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही,रा.चौंडी,ता.जामखेड – फरार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली.याप्रकरणी आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९२३/२०२६ नुसार गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फरार आरोपी अक्षयचा शोध पोलीस घेत आहेत.
