कोणाला काही सांगितलं तर जिवंत मारून टाकीन! साईबन टेकडीवर प्रेमीयुगुलाला लुटणाऱ्या बीडच्या गुंडाच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातील साईबन टेकडीवर मैत्रिणीसोबत बोलत बसलेल्या एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत,गळ्याला चाकू लावून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल,धारदार चाकू, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,नेप्ती (ता.जि. अहिल्यानगर) येथील जपकर वस्ती येथे राहणारा मनोज नानासाहेब गाडगे (वय २०, खाजगी नोकरी) हा तरुण दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत निंबळक बायपास रोडने साईबनकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील एका छोट्या टेकडीवर बोलत बसला होता. त्यावेळी अचानक एका मोटारसायकलवरून अनोळखी इसम तेथे आला.
त्याने काही समजण्याच्या आत मनोजला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.त्यानंतर खिशातून धारदार चाकू काढून थेट मनोजच्या गळ्याला लावला आणि “याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जिवंत मारून टाकीन” अशी धमकी दिली.आरोपीने मनोजच्या पॅन्टच्या खिशातील पैशांचे पाकीट,रोख रक्कम तसेच त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल फोन असा ऐवज बळजबरीने हिसकावून घेऊन अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.याप्रकरणी मनोज गाडगे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथके रवाना केली.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण केले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अक्षय भिमराव मोरे (वय २४ वर्षे,मूळ रा.सिंधफना वडळी,ता.शिरूर कासार,जि. बीड;हल्ली रा.विळद,ता.जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.खाकीचा धाक दाखवून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, गुन्हा करताना वापरलेला चाकू तसेच चोरीस गेलेला मोबाईल, रोख रक्कम आणि पाकीट असा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय कोटे करत आहेत. सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत थोरात,पोलीस उपनिरीक्षक अजय कोटे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश खेडकर,पोलीस हवालदार शैलेश रोहोकले,राजू सुद्रीक,पोलीस कॉन्स्टेबल दिपक फुंदे,नवनाथ दहिफळे,किशोर जाधव, राजेश राठोड,राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या पथकाने केली.
