दुष्काळी परिस्थितीत तमाशा व लोककलावंतांना आर्थिक मदतीची गरज-श्रीकांत भालेराव..तमाशा व लोककलावंतांना विशेष आर्थिक पॅकेज ची मागणी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-नाटक, तमाशा,गोंधळ,भारुड व इतर कलेचे कलावंत प्रत्येक मंचावर विविध कलांचे सादरीकरण करून रसिक, प्रेक्षक व श्रोत्यांच्या मनोरंजन, प्रबोधनाचे माध्यम म्हणून “लोककलेला” ओळखले जाते.दुष्काळाची वाढती झळा शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाबरोबर तमाशा कलावंत व इतर लोक कलावंतांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शेतीवर आधारित ग्रामीण अर्थचक्र आणि सण-उत्सव, परंपरा लोक कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधना
असल्याने नाटक, तमाशा, गोंधळ,भारुड, कीर्तन यासारख्या इतर लोक कलावंतांना दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यातील कलावंत आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. दैनंदिन व्यवहार व कुटुंबाचा सांभाळ कसा करावा, कर्ज व उसनवारीची परतफेड कशी करावी आणि मुलांचे शिक्षण व तसेच वितभर पोटाची खळगी कशी भरावी,असे अनेक प्रश्न कलावंतांसमोर आ वासून उभे ठाकले आहेत.
यामुळे सर्व तमाशा कलाकार व इतर कलावंत चिंतातूर झाले आहेत. याबाबत शासनाने वेळीच उपाययोजना करून कलाकार,कलावंतांना मदत करण्यासाठी निधीची तरतूद करणे काळाची गरज आहे. कलावंतांचे मानधनात वाढ करण्यात यावी, तसेच ज्या कलावंतांना मानधन मिळत नाही अशा कलावंतांना विशेष आर्थिक मदत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावी. अशा प्रकारे तमाशा कलाकार व लोक कलावंतांना आर्थिक मदत देणारा धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा देण्याची मागणी कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.
हातावरचं पोट घेऊन तमाशा कलावंत गावगावच्या जत्रा यात्रांमध्ये तमाशातुन आपली कला सादर करतात व त्यातून त्यांचा उदर निर्वाह चालतो. मात्र, दोन वर्षाच्या निसर्गाच्या पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे अर्थचक्र कोलमडले आहे. त्याचा थेट प्रभाव तमाशा व इतर कलावंतांच्या उत्पन्नावर झाला आहे.चालू वर्षी दुष्काळामुळे सण-उत्सव,यात्रा आणि धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर मोठा परिणाम होऊ शकतो.त्यात अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा फटका बसल्यास खर्च भागवणंही कठीण होते. यंदा जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर मोठा खंड पडल्यानं शेतात अपेक्षित पीक आलं नाही. काही ठिकाणी पिकांतून उत्पादन खर्चही निघणं अवघड झालं आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. याचा थेट परिणाम सण यात्रा उत्सव यांच्यावर होणार आहे.मागील दोन वर्ष फड मालक आणि कलावंत आर्थिक संकटातुन जात असताना, हाताला मिळेल ते काम करुन पोटाचं खळगं भरत होते. यंदा फड पुन्हा उभे करण्यासाठी फडमालकांना बँकांचे आणि सावकारी कर्जाची उभारणी करुन कलावंत जमा करावे लागतील.दुष्काळामुळे आता हा तमाशा उभा रहायच्या आधीच पुन्हा पडलाय.आता कर्जाचा डोंगर आणि कलावंताची देखील फरपट तमाशातल्या वगा सारखी झाली आहे.शेकडो वर्षांची तमाशाची ही लोककला जोपासणाऱ्या कलाकारांच्या कलेचा आता तमाशा होऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. आता या कलेला जोपासणा-यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. त्यातच फड मालकांसह कलावंतांची होणारी फरपट आणि त्यात दुष्काळाचे संकट आता जगायचं तरी कसं? असाच नवा वग तमाशात सुरु झालाय. त्यामुळे शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तमाशा कलावंत व इतर लोककलावंतांना आधार देण्याची गरज आहे.तमाशा व इतर लोक कलावंतांना दिवाळीपूर्वी विशेष आर्थिक मदत करण्याची मागणी अध्यक्ष श्रीकांत भालेराव आणि सचिव नितीनचंद्र चांगदेव भालेराव यांनी निवेदन द्वारे केले आहे.
