१ कोटी ७२ लाखांचा मद्यसाठा जप्त:नगर-मनमाड हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरारक छापा..
अहिल्यानगर प्रतिनिधी:-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नांदगाव शिवारात नगर-मनमाड महामार्गावर कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला.या कारवाईत कंटेनरसह एकूण सुमारे १ कोटी ७२ लाख ४२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हॉटेल जयविजयसमोर नगर-मनमाड रोडवर पथकाने सापळा रचला.यावेळी संशयित दहा चाकी कंटेनर अडवून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये मध्य प्रदेशात विक्रीस परवानगी असलेला, मात्र महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला.
जप्त केलेल्या मद्यामध्ये ७५० मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या ७ हजार ६३२ सीलबंद बाटल्या, १८० मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या १४ हजार बाटल्या आणि १८० मिलीच्या बॅगपायपर व्हिस्कीच्या १६ हजार ३२ बाटल्यांचा समावेश आहे.हा संपूर्ण साठा एकूण १ हजार २५० बॉक्समध्ये होता.या प्रकरणी कंटेनर चालक मुस्तकीम मुंशी खान (राहणार धारड,तालुका रतलाम,मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५(अ)(ई), ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले,उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एक निरीक्षक सुरज कुसळे, बाबुराव घुगे निरीक्षक ब विभाग अहिल्यानगर एक,दुय्यम निरीक्षक जावळे,दुय्यम निरीक्षक चव्हाण,जवान सुरज पवार,सुनील निमसे,चतुर पाटोळे, दिनेश खैरे,सिद्धांत गिरी गोसावी,प्रथमेश पंडित,अर्चना दहिफळे,पांडुरंग गदादे,निहाल शेख यांनी केली आहे.
