मध्यप्रदेशची ‘घरफोडी गँग’ जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई,लाखांचा मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरातील शिवनेरी चौक परिसरातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी विवेक मारोतराव साखरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याची वाढती गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक विशेष तपास पथक तयार करून त्यांना तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या.तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून तपास सुरू ठेवला असता,हा गुन्हा मध्यप्रदेशातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.आरोपी नेवासा फाटा येथे येणार असल्याची कुणकुण लागताच पथकाने तातडीने सापळा रचून मुख्य आरोपी कपील चंपालाल चावडा (रा.पटवारी कॉलनी, बडवा,मध्यप्रदेश) यास ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली असता,त्याने आपल्या साथीदारासह हा कट रचल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील दुसरा आरोपी राजा चेयनसिंग पटेल यालाही ताब्यात घेतले.त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज जप्त करण्यात आला,तसेच चोरीचा माल खरेदी करणारे छत्रपती संभाजीनगर येथील अनिल रामनारायण तिवारी आणि भारत नानासाहेब जोशी यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सर्व आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून,पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये,पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे,योगेश भिंगारदिवे,शाहिद शेख,संदीप पवार,फुरकान शेख,मनोज साखरे,अमोल कोतकर, महादेव भांड यांनी केली आहे.
