जमिन नोंदीची ‘किंमत’ १ लाख २५ हजार..! ‘तो’ लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..
अहिल्यानगर/श्रीगोंदा (प्रतिनिधी):-ग्रामपंचायत दप्तरी जमिनीची नोंद करण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची घसघशीत लाच मागणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी व कोळगावचे ग्रामविकास अधिकारी शरद साहेबराव कवडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदाराच्या वडिलांनी काष्टी येथे एक जागा खरेदी केली होती.या खरेदी केलेल्या जागेच्या दस्ताची आणि नोटरी संमतीपत्राची नोंद ग्रामपंचायतीच्या ‘नमुना नं. ११’ मध्ये करण्यासाठी शासकीय नियम असतानाही, ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी कायदेशीर कामासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सरकारी कार्यालयातील अशा भ्रष्ट आणि बेकायदेशीर मागणीमुळे हैराण झालेल्या तक्रारदाराने थेट अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेत या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली.एसीबीने या प्रकरणाची खात्री करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर गुन्ह्याची कारवाई केली आहे. या घटनेमुळे ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांची होणारी पिळवणूक पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
