हॉटेलचे अन्न आणि औषधात भेसळ? आता एका क्लिकवर होणार झटपट कारवाई..अन्न व औषध प्रशासनाने केले हायटेक पोर्टल सुरू..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-हॉटेल मधील निकृष्ट दर्जाचे अन्न,भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ किंवा मेडिकलमधील मुदतबाह्य (Expired) औषधे…आता अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांच्या हाती थेट तक्रारीचे डिजिटल अस्त्र आले आहे.महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून complaints.mahafda.in हे अत्याधुनिक पोर्टल सुरू करण्यात आले असून,यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रार नोंदवणे आता अगदी सोपे;प्रमुख वैशिष्ट्ये:
बोलून तक्रार नोंदवा:जेष्ठ नागरिकांना किंवा टाईप करायला अडचणीच्या असणाऱ्यांसाठी ‘स्पीच टू टेक्स्ट’ (Speech to Text) सुविधा देण्यात आली आहे. यामुळे नागरिक थेट बोलूनही तक्रार नोंदवू शकतात.थेट फोटो अन् जीपीएस लोकेशन:तक्रार करताना बिलाची पावती,खराब अन्नाचे/औषधाचे छायाचित्र, बॅच नंबर आणि GPS लोकेशन जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे अधिकाऱ्यांना थेट संबंधित दुकानात किंवा हॉटेलमध्ये पोहोचणे सोपे होईल.
ट्रॅकिंग नंबरने मागोवा: तक्रार दाखल होताच नागरिकाला एक युनिक ट्रॅकिंग नंबर मिळेल.यावरून तक्रारीवर काय कारवाई झाली,हे मोबाईलवरच पाहता येईल.
त्रिभाषिक सुविधा:हे पोर्टल मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.
‘AI’ तंत्रज्ञान करणार अर्जांची छाननी
या तक्रार निवारण प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) प्रभावी वापर करण्यात आला आहे. अन्नविषबाधेसारख्या (Food Poisoning) गंभीर आणि आणीबाणीच्या तक्रारींना AI प्रणालीद्वारे ‘सर्वोच्च प्राधान्य’ (High Priority) दिले जाते.
प्राप्त झालेली तक्रार २४ तासांच्या आत संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्याकडे वर्ग होऊन तात्काळ तपासणीचे आदेश दिले जातात.तसेच,प्रशासकीय कामकाजासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस तयार करणे, संदर्भ शोधणे यासाठी AI असिस्टंट ची मदत मिळणार आहे.
तक्रारदाराची माहिती राहणार पूर्णपणे गुप्त
या प्रणालीमध्ये नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची (Data Privacy) पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. तक्रारदाराचे नाव आणि मोबाईल क्रमांक पूर्णपणे गोपनीय राखला जाणार आहे.
प्रशासनाचे आवाहन:
हे पोर्टल नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ खरी आणि पुराव्यासहित माहितीच अपलोड करावी. चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या तक्रारींचीही सिस्टीममध्ये नोंद राहते, त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने आणि सार्वजनिक हितासाठीच या यंत्रणेचा वापर करावा.
