एलसीबीचा एकाच दिवशी मोठा दणका! मुकुंदनगरात बेकायदेशीर कत्तलखाना तर पाथर्डीत वाळूमाफियांची टोळी उद्ध्वस्त तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंदे आणि माफियांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने धडक मोहीम उघडली असून सलग दोन मोठ्या कारवायांनी गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.मुकुंदनगरातील मुल्ला कॉलनी परिसरात सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या,तर दुसरीकडे पाथर्डी तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई करत जेसीबी आणि डंपरसह तब्बल ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी या दोन्ही कारवाया यशस्वी केल्या.अवैध धंद्यांची माहिती घेत असताना,स्थानिक गुन्हे शाखेला मुकुंदनगरातील मुल्ला कॉलनी येथील एका घरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता तन्वीर सत्तार कुरेशी (रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट,अहिल्यानगर),एजाज जानमोहमंद कुरेशी (रा.जुने कलेक्टर कार्यालयाजवळ,झेंडीगेट),सालीम शब्बीर कुरेशी (रा. सुभेदार गल्ली,झेंडीगेट अशा ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार हे घर सालीम कुरेशीचे असून त्याच्या सांगण्यावरूनच ही विक्री सुरू होती. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८५/२०२६ नुसार बीएनएस कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारित) कायदा कलम ५(क), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलीस पुढील तपास करत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके,संदिप पवार,विजय ठोंबरे,शाहीद शेख,गणेश लोंढे,अभिजीत अरकल आणि रोहित मिसाळ यांनी केली.
तर दुसऱ्या कारवाईत अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात कारवाईसाठी नेमलेल्या पथकाला दि.२०/०९/२०२६ रोजी गोपनीय बातमी मिळाली की,पाथर्डी येथील बोरुडे मळा परिसरात जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये अवैध वाळू भरून वाहतूक केली जात आहे.पथकाने घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला.ताब्यात घेतलेला आरोपी (जेसीबी चालक):उमेश विष्णु कचरे (वय २२, रा. पाडळी,ता.पाथर्डी,जि. अहिल्यानगर),फरार आरोपी (वाहनांचा मालक),नारायण बोरुडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.बोरुडे मळा,ता.पाथर्डी) चालक उमेश कचरे याच्याकडे परवाना नसून तो मालक नारायण बोरुडे याच्या सांगण्यावरून ही वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.बेकायदेशीर वाळू प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण कायदा कलम ३ व १५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे,रणजीत जाधव, अमोल कोतकर आणि सतीष भवर यांनी केली.
